सिल्लोड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता पकडला. पोलिसांची चाहूल लागताच चालकाने ट्रॉलीतील वाळू खाली करून ट्रॅक्टर - ट्रॉली घटनास्थळीच सोडून पळ काढला. या प्रकरणी अज्ञात चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी निवृत्ती गोपीनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीने शासनाची रॉयल्टी बुडवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पूर्णा नदीपात्रातून अंदाजे १ ब्रास वाळू बेकायदेशीररित्या ट्रॉलीमध्ये भरून वाहतूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रॉलीतील वाळू खाली करून ट्रॅक्टर-ट्रॉली जागेवरच सोडून पलायन केले. पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली असून अज्ञात चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इंगळे करीत आहेत.














